अर्जुनी/मोर (प्रतिनिधी) :- शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नवीन बस स्थानक परिसरातील दुर्गंधी आणि संपूर्ण नगरात वाढलेला डासांचा प्रकोप ही गंभीर समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध नागरिक समस्यांकडे लक्ष वेधत नगर पंचायत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
नवीन बस स्थानक परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळील नाल्यांमध्ये साचलेले घाण पाणी, कचरा व असह्य दुर्गंधीमुळे प्रवाशांना तसेच स्थानिक नागरिकांना थांबणेही कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, संबंधित नाल्यांची दीर्घकाळ साफसफाई न झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली असून आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
तसेच, शहरातील अनेक भागांत नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे डासांची संख्या झपाट्याने वाढली आहे. परिणामी मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत असून लहान मुले, महिलां आणि ज्येष्ठ नागरिक यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
निवेदनात नवीन बस स्थानक परिसरातील नाल्यांची तात्काळ साफसफाई करून त्यांना कायमस्वरूपी फरशीने पॅक करावे.संपूर्ण शहरात तातडीने फॉगिंग (डास प्रतिबंधक फवारणी) मोहीम राबवावी.साचलेले पाणी काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी नाल्यांची नियमित देखभाल व स्वच्छता सुनिश्चित करावी.
“नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. तात्काळ ठोस उपाययोजना न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते,” असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष तथा ‘युथ इन ॲक्शन’ संघटनेचे उपाध्यक्ष सुधांशु मेहता, राष्ट्रवादी कार्यकर्ते संघटनेचे सरचिटणीस नयन रुखमोडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा सचिव अश्विनसिह गौतम , संघटनेचे सदस्य नवाज छवारे, दुर्गा चौक गणेश मंडळ सदस्य व सामाजिक कार्यकर्ते चिरायू वावरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून स्वच्छता व आरोग्य सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी नागरिकांतून होत आहे.
