– जागतिक होमिओपॅथी सप्ताहनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
गोंदिया, दि.9 : सर्व सामान्यांची आवडती पॅथी म्हणून होमिओपॅथीकडे पाहिजे जाते. या पॅथीचे दुष्परिणामही कमी असल्याची प्रतिक्रिया रुग्णांकडून मिळत असते, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर यांनी केले.
गोंदिया होमिओपॅथी कॉलेज ॲन्ड हॉस्पीटल येथे ‘जागतिक होमिओपॅथी सप्ताह’निमित आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी गोंदिया होमिओपॅथी कॉलेजचे प्राचार्य डॉ.रोशन कानतोडे, दंतरोग तज्ञ डॉ.अक्षत अग्रवाल, डॉ.वर्षा कानतोडे, डॉ.प्राची अग्रवाल मंचावर उपस्थित होते.
श्रीमती निमसरकर पुढे म्हणाल्या, मानसिक आजार, सांधेदुखी, व इतर अंग दुखीचे आजार, गुंतागुंतीचे आजार विशेषत: ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांचे आजार यावर इतर उपचारांपेक्षा होमिओपॅथी उपचार उपयुक्त ठरतात. पेनकिलर सारखी औषधे घातक ठरतात. तर होमिओपॅथी औषधांचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो. ती गोड असल्याने मुले आनंदाने घेतात. तसेच होमिओपॅथी औषधे इतर औषधांपेक्षा स्वस्त आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.
दंतरोग तज्ञ डॉ.अक्षत अग्रवाल यांनी लहान मुलांच्या दातांची आपण कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. आपले दात सुरक्षीत ठेवण्यासाठी दररोज सकाळी व रात्री असे दोनदा ट्युथब्रश करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक डॉ. वर्षा कानतोडे यांनी केले. दिनांक 10 ऑगस्ट 1989 पासून गोंदिया येथे बी.एच.एम.एस. कॉलेज सुरु करण्यात आले. या कॉलेजच्या उभारणीसाठी माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे मोठे योगदान आहे. या कॉलेजमध्ये ओपीडी असून उपचारासाठी आलेल्या रुग्णांची नियमीत तपासणी करुन औषधोपचार केला जातो. होमिओपॅथी उपचारामुळे रुग्ण बरे होतांना दिसून येत आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. इनसीया व डॉ. मेघा खोब्रागडे यांनी केले. उपस्थितांचे आभार गोंदिया होमिओपॅथी कॉलेजचे प्राचार्य डॉ. रोशन कानतोडे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. भाग्यश्री, डॉ. पुरी, डॉ. प्राची, डॉ. तिवारी, डॉ. मेघा खोब्रागडे, डॉ. खुशी तेजवानी यांचेसह गोंदिया होमिओपॅथी कॉलेजचे विद्याथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
