ट्रेंडिंग स्टोरी
विज्ञापन

पेपर फुटी प्रकरणा विरोधात वंचित ने दिले निवेदन

तिरोडा : – दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या सुमारे २० दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात विविध संघटनांकडून विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठविला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, तिरोडाच्या कार्यकर्त्यांनी जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अन्यायाचा निषेध करत भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे तिरोडा येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांच्यामार्फत निवेदन सादर केले.

या निवेदनामध्ये जखमी विद्यार्थ्यांना योग्य भरपाई देण्यात यावी, प्रभावित कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत संधी द्यावी, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत आणि विद्यार्थ्यांच्या सर्व रास्त मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला नाही आणि त्यांच्या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

शेवटी, राष्ट्रपतींनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा व त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, तिरोडा यांच्या वतीने करण्यात आली.

Leave a Comment