ट्रेंडिंग स्टोरी
विज्ञापन

वाघाच्या हल्ल्यात सहा वर्षीय प्रज्वलचा मृत्यू; धाबे टेकडी परिसरात भीतीचे सावट

गोंदिया :- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबे टेकडी आदर्श गावात १० एप्रिल रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास अत्यंत धक्कादायक घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात सहा वर्षीय प्रज्वल गोवर्धन मेश्राम याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्वल हा लघुशंकेसाठी घराबाहेर गेला असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. वाघाने प्रज्वलला उचलून जवळच्या जंगलाच्या दिशेने नेले. घटनेनंतर कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी मोठा आरडाओरड करत तात्काळ शोधमोहीम सुरू केली.

काही अंतरावर शोध घेत असताना प्रज्वल गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. मात्र, त्याला वाचवता आले नाही आणि या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी वनविभागाने तात्काळ कारवाई करून वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. तसेच गावात सुरक्षा उपाययोजना वाढवण्याचीही गरज व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास व आवश्यक ती कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Comment