ट्रेंडिंग स्टोरी
विज्ञापन

रस्त्याच्या वादातून शेजाऱ्यांमध्ये हाणामारी; महिलेचा विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल

▪️ दिघोरी पोलिसांत दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा; तपास सुरू

संदिप लंजे /मुरमाडी:-  लाखांदूर तालुक्यातील चिचाळ येथे घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जुन्या वादातून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणाचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार मारहाण, अश्लील शिवीगाळ, विनयभंग तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिघोरी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून २०२६ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास चिचाळ येथे फिर्यादी महिलेचा मुलगा घराच्या कुंपणावरील तुटलेली ताटी बांधत असताना शेजारी राहणाऱ्या आरोपींसोबत वाद झाला. तक्रारीनुसार, आरोपींनी प्रथम फिर्यादीच्या मुलाला मारहाण केली. हा वाद सोडविण्यास गेलेल्या गिताबाई प्रशांत मानकर (वय ५४) यांनाही मारहाण करण्यात आली.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपींपैकी एका व्यक्तीने त्यांच्या केसांना धरून मारहाण केली, अश्लील शिवीगाळ केली तसेच त्यांच्या साडीचा पदर ओढून विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर दोन्ही आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

या तक्रारीवर तसेच वैद्यकीय तपासणी अहवालाच्या आधारे अविनाश मंगलदास सोनपिंपळे (वय ५०) व धनमाला अविनाश सोनपिंपळे (वय ४४)दोघेही रा. चिचाळ यांच्याविरुद्ध कायमी गुन्हा क्रमांक १४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७९, २९६, ११५(२), ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद दिघोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार हितेश मडावी करीत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, पुढील कारवाई तपासाअंती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment