सालेकसा, ता. 21 जून :- सालेकसा पोलिसांनी अवैध देशी दारू वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे तथा उपविभागीय पोलीस अधिकारी मदामे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध दारू विक्री, साठा व वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने रविवार, 21 जून रोजी सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजा गिरोला ते तिरखेडी मार्गावर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली.
तपासणीदरम्यान पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो (क्र. एमएच 28 व्ही 4420) अडवून पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनात रॉकेट देशी दारूच्या 60 पेट्या आढळून आल्या. प्रत्येक पेटीत 100 नग 90 एम.एल. क्षमतेचे पाऊच असून एकूण 6 हजार पाऊच जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या दारूची किंमत 2 लाख 40 हजार रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या बोलेरो वाहनाची किंमत 5 लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संजय सदाशिव राऊत (वय 50) व गणेश ईश्वर निकोडे (वय 36) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडे दारू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना अथवा पास नसल्याने त्यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी सालेकसा पोलीस ठाण्यात अप. क्र. 311/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम 65(अ), 65(ई), 77(अ), 77(ब) व 83 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक बुराडे यांच्या नेतृत्वाखाली पो.हवा. खुशरंग बिसेन, पो.हवा. खांडवाहे, पो.हवा. लांडगे, पो.ना. जांभुळकर, पो.शि. लगदिवे व पो.शि. गौतम यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
