विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; योगाचे महत्त्व पटवून दिले
राजु फुंडे प्रतिनिधी सालेकसा :- आई फाऊंडेशन सालेकसा द्वारा संचालित ए. पी. जे. फ्युचुरा स्कूल व ए. पी. जे. किड्स, आमगावखुर्द (ता. सालेकसा) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून योगाबद्दल जागरूकता दर्शविली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे संस्थापक मा. शैलेश बहेकार यांनी योग दिनाचे महत्त्व, योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विविध योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार तसेच व्यायामाचे प्रात्यक्षिक सादर केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पराग फुंडे यांच्या हस्ते योग विषयक पुस्तके विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी योगासने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे पर्यवेक्षक संतोष ठाकरे तसेच शिक्षिका निता बोपचे, भूमेश्वरी टेंभरे, शांती यादव, वंदना रहांगडाले, देवेश्री गभणे, सुरभी टेंभरे आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना फळांचे वितरण करण्यात आले. आनंददायी व आरोग्यदायी वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी अधिक जागरूकता निर्माण झाली.
