ट्रेंडिंग स्टोरी
विज्ञापन

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास; पिपरिया येथे शेकडो नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

माजी आमदार सहाराम कोरोटे यांच्या उपस्थितीत पिपरिया येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा. 

सालेकसा प्रतिनिधी :-     सालेकसा अंतर्गत मौजा पिपरिया, येथे दि.२०जून २०२६ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे  यांच्या जनहितवादी, विकासाभिमुख व निर्णयक्षम नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत तसेच महाराष्ट्र प्रदेश शिवसेना आदिवासी विभागाचे अध्यक्ष तथा क्षेत्राचे माजी आमदार सहषरामजी कोरोटे यांच्या कार्यकुशल, लोकाभिमुख व संघर्षशील नेतृत्वाने प्रभावित होऊन पिपरिया जिल्हा परिषद क्षेत्रातील शेकडो युवक, महिला, शेतकरी व विविध समाज घटकातील नागरिकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

ग्रामपंचायत चौक, पिपरिया येथे आयोजित भव्य शिवसेना कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमादरम्यान शेकडो नागरिकांनी शिवसेनेचा भगवा दुपट्टा परिधान करून पक्षप्रवेश केला व शिवसेनेच्या विचारधारेशी निष्ठा व्यक्त केली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना राज्यातील विकासकामे, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी घेतले जाणारे निर्णय, आदिवासी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शिवसेना पक्ष हा सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी व युवकांचा पक्ष असून आगामी काळात पक्षाची ताकद अधिक वाढविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात संघटन मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले.

या पक्षप्रवेशामुळे पिपरिया जिल्हा परिषद क्षेत्रात शिवसेनेची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे. उपस्थित नागरिकांनी मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत शिवसेनेला अधिक बळकट करण्याचा निर्धार केला.

यावेळी अर्जुनसिंह बैस जिल्हा प्रमुख युवासेना, डॉ. योगानंद परकीवार जिल्हा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, दुर्गाताई टेकाम शिवसेना आदिवासी विभाग महिला आघाडी जिल्हा प्रमुख, बळीराम कोटवार विधानसभा प्रमुख शिवसेना, विजय नागपुरे तालुका प्रमुख शिवसेना सालेकसा, जयपाल प्रधान तालुका प्रमुख शिवसेना देवरी, डॉ. राजेश कोकोटे तालुका प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता डॉ. सुनील पगरवार तालुका संघटक युवासेना तथा अविनाश उईके तालुका प्रमुख आदिवासी विभाग यांनी परिश्रम घेतला.

कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते, पिपरिया यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसर भगवामय झाला असून शिवसेनेच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते.

Leave a Comment