ट्रेंडिंग स्टोरी
विज्ञापन

मुख्य चौकातील उघड्या नाल्यांमुळे अपघाताचा धोका; नगर पंचायतीचे दुर्लक्ष..!

राजू फुंडे | प्रतिनिधी, सालेकसा :- सालेकसा नगर पंचायत हद्दीतील गांधी चौक हा शहराचा प्रमुख व अत्यंत वर्दळीचा चौक असून येथून रेल्वे स्टेशन रोड, पोलीस स्टेशन रोड, बस स्टॉप रोड, कुमार मोहल्ला चौक रोड तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रोड असे महत्त्वाचे मार्ग जोडलेले आहेत. मात्र गांधी चौकातून ५ चौकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या नाल्यांवर अनेक ठिकाणी संरक्षणात्मक झाकण नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या परिसरात दर आठवड्याला बाजार भरत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक, व्यापारी तसेच वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी उघड्या नाल्यांमुळे पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी किंवा गर्दीच्या काळात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्थानिक नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाकडे नाल्यांवर मजबूत सिमेंट काँक्रीटचे झाकण बसविण्याची मागणी केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

अपघात घडण्यापूर्वीच संबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही करून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी सालेकसा शहरातील नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment