‘स्मृतिगंध’ या संगीतसभेत गायिका खुशबू कठाणे यांनी श्रोत्यांशी संवाद साधला..!

वर्धा प्रतिनिधी :- स्व. मनोहरराव हेडाऊ आणि स्व. सुधाकरराव वडतकर यांच्या स्मरणार्थ श्री. अजय हेडाऊ आणि श्री. हरीश वडतकर हे ‘स्मृतिगंध’ हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतात. यावर्षीचा कार्यक्रम दि. 2 जानेवारीला स्व. सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात संध्याकाळी 7:00 वाजता आयोजित केला गेला. दोन सत्रांत गुंफलेल्या या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात वर्ध्यातील प्रथितयश गायिका खुशबू कठाणे यांचे शास्त्रीय गायन होते. तसेच द्वितीय सत्रात आळंदी येथील संगीतसाधक तुकाराम दादा पांचाळ यांचे मृदंगवादन होते.

दीपप्रज्वलन, प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. किरण पट्टेवार यांनी संचालन केलं. प्रास्ताविक अजय हेडाऊ यांनी केलं. प्रमुख पाहुणे श्री. वसंतराव जळीत यांनी सुधाकरराव वडतकर आणि मनोहरराव हेडाऊ यांच्या आठवणी सांगितल्या. अध्यक्ष श्री. विकास काळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देतानाच स्मृतिगंध कार्यक्रमातील सातत्याबद्दल हेडाऊ आणि वडतकर परिवारांचे अभिनंदन केले.

प्रथम सत्रातील खुशबू कठाणे यांच्या गायनापूर्वी त्यांचे, साथसंगतदारांचे स्वागत, परिचय झाले. गायनास सुरुवात करण्यापूर्वी खुशबू यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. नवी पिढी शास्त्रीय संगीत फार कठीण, वेळखाऊ समजते, पण संगीतातील कोणत्याही प्रकारात आपलं भविष्य पहात असाल तर शास्त्रीय संगीत साधनेला पर्याय नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं. साधेपणा, मार्दव, लयकारी यातून शास्त्रीय संगीत साधता येतं, सुरांमधून भाव प्रदर्शित करता येतात फक्त साधना तितकी साधायला हवी! पहिला लावलेला षड्ज तुम्हाला ध्यानात घेऊन गेला तर प्रयत्न योग्य दिशेने आहेत, हे समजून जा! कष्टाशिवाय यशप्राप्ती नाही. शास्त्रीय संगीत समाजमनात रुजवण्यासाठी, जोपासण्यासाठी प्रयत्न करत राहणे हे माझं नैतिक कर्तव्य मानते, असंही त्या पुढे म्हणाल्या.

गोरख कल्याण या मधुर रागातील जयपूर घराण्यातील गायकीने नटलेल्या विलंबित त्रितालातील बडा ख्याल
आशिष दो मोहे, तुम करतार सुजान हो
जनम जनम का अंधियारा दूर करो
आशा के दीप जगाओ ने संगीतसभेला सुरूवात झाली. अतिशय मार्दवपूर्ण स्वर, स्पष्ट वाणी, दोन स्वरांना अलगद, बेमालूमपणे जोडणारी मिंड, विलंबित लयीत एकेका सुरावरील स्थैर्य यामुळे बडा ख्याल खूपच रंगला.

पाठोपाठ अद्धा त्रितालात बांधलेला छोटा ख्याल सांझ की बेला शुभ दिन आज
सकल गुणिसंग हर्ष मनाओ
सब मिल मंगल गाओ रिझाओ
शुभ आशिष मिलकर पाओ द्रुत गतीच्या सौंदर्याची उधळण करत रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेला. सुरेख सरगम, आलापी, खणखणीत ताना – सुरावटीतून भाव सुस्पष्ट पणे श्रोत्यांपर्यंत पोचले.

श्री अजय यांनी ‘प’ हा वर्ज्य स्वर या रागात प्रथमच ऐकला असं म्हटल्यावर खुशबू म्हणाल्या, ‘विवादी स्वर म्हणून घेतला.’ वादी, संवादी आणि रागाचे मुख्य स्वर शिवाय जे ते विवादी स्वर, जे रागाचं स्वरूप बिघडवू पण शकतात. पण कुशल कलाकार रागाचे सूक्ष्म सौंदर्य वाढवण्यासाठी, त्यात नाविन्य आणण्यासाठी असा विवादी स्वरांचा सावधपणे प्रयोग करतात. या ठिकाणी खुशबूने त्यांचं हे कौशल्य रसिकांपर्यंत यशस्वीरित्या पोचवलं!

यानंतर उपशास्त्रीय संगीतातील ‘चैती’ चैतमास बोले रे कोयलिया ओ रामा मोरे अंगनवा
कुहूक कुहूक करे काली रे कोयलिया
हुक उठत मोरे हियामे ओ रामा
याद आवत जब पिया की मिलन की
भर भर आये रे नयनवा ओ रामा
ऐकताना खरोखरच वसंतऋतू आलाय की काय, असे वाटले.

यानंतर संत कबीर यांचे निर्गुणी भजन चादर हो गई बहुत पुरानी
अब तो सोच समझ अभिमानी आणि गुलाम अली यांची गझल महफिल मे बार बार किसीपर नजर गई
हमने बचाई लाख मगर फिर उधर गई या दोन सादरीकरणांनंतर पहिल्या सत्राचे समापन झाले. खुशबूच्या गाण्यामध्ये किशोरीताई आमोणकर यांची अनेकदा आठवण आली. यावेळी तबल्यावर श्री आकाश जवादे आणि संवादिनीवर श्री नरेंद्र माहुलकर यांनी समर्थ साथ केली.

आळंदी देवाची येथून आपल्या दोन शिष्यांसह आलेले मृदंगवादक श्री तुकाराम दादा पांचाळ यांचं स्वागत, परिचय झाले. त्यांचे गुरू सुशीलकुमार जैन यांनी रचलेल्या ‘विनायक स्तुती’ या गणेशवंदनेने त्यांनी सुरूवात केली. तुकाराम दादा पहिले रचनेचे बोल ऐकवून मग मृदंगावर उमटवत होते. त्यांच्या गुरूंनी रचलेल्या ताल सुलताल च्या काही बंदिशी, काही पारंपारिक बंदिशी त्यांनी प्रस्तुत केल्या. ताल आदिताल मधील काही बंदिशी, तिहाई, रेले त्यांनी प्रस्तुत केले. एक शिष्य मृदंगावर तर एक टाळ घेऊन साथ करत होता. लहरा संगत श्री रवी खाडे यांनी केली. पद्मश्री सुरेश तळवलकर यांच्याकडे तुकाराम दादांचे शिक्षण सुरू आहे. त्यांच्याही काही रचना यावेळी प्रस्तुत झाल्या. शिवविवाहाच्या वेळी इतर देव काय काय करत होते ही रचना असो की खायच्या पदार्थांची नावे असलेली किंवा पोस्टाच्या पेटीत पत्र टाक सांगणारी अशा गमतीशीर रचना असो, त्यांनी त्या सुरेख सादर केल्या. तुकाराम दादांच्या वादनात पं. सुरेश तळवलकर यांचा प्रभाव प्रकर्षाने जाणवला. ‘ज्ञानोबा – तुकाराम’ च्या गजराने मृदंगवादनाचे समापन झाले.

शास्त्रीय संगीत हे मनापासून मनापर्यंत जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. जितके प्रयत्न प्रामाणिक तितकं यश जास्त! खुशबूच्या प्रस्तुतीमधे अर्ध्यापेक्षा जास्त वेळ ख्याल गायन होतं. केवळ स्वर! अर्थात जितका भाव त्या स्वरांमधून मनापर्यंत पोचला तितकी त्यांची साधना मोठी आणि रसिकांच्या मनाची तरलता ही तेवढीच महत्त्वाची! पण तिथे गायकाचा आवाज, स्वर तरी आहेत. मृदंगवादन म्हणजे फक्त नाद, ताल, लय, संवादिनीचे लयीतले स्वर! पण भान हरपून जाणे म्हणजे काय ते त्या वादनाने कळलं! मृदंगातून नाद निर्माण होतोच पण काही काही ठिकाणी अक्षरशः बोल ऐकू येत होते…. हे लिहितांनाही रोमांच उठलेत!

अतिशय स्वर्गीय अनुभूती ह्या संगीतसभेने मिळवून दिली याबद्दल हेडाऊ आणि वडतकर परिवारांचे हार्दिक आभार. या कार्यक्रमाच्या विषयी सौ हर्षदा मशांनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप रूचकर भोजनाने झाला.

Leave a Comment