पवनी/अमित रणदिवे :- “मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, इतुके मला सरणावर, जळताना कळले होते…” या सुप्रसिद्ध कवी सुरेश भटांच्या वेदनादायी ओळी सध्या भंडारा जिल्ह्यातील , पवनी तालुक्यातील ऐतिहासिक, शैक्षणिक आणि व्यापारी दृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या अड्याळ गावाची भीषण परिस्थिती अधोरेखित करण्यासाठी पुरेशा ठरत आहेत.
एकेकाळी शांत, सुसंस्कृत आणि अन्यायाविरुद्धच्या आंदोलनांनी गाजणाऱ्या या गावात आज जनसामान्यांच्या मूलभूत समस्यांचा पुरता बोजवारा उडाला असल्यामुळे “कुठे नेऊन ठेवलाय गाव माझा? आणि कुठे गेले ते निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतीक ठरलेल्या आणि ऐतिहासिक भोसलेकालीन घोडायात्रेसाठी संपूर्ण विदर्भात नावाजलेल्या अड्याळ गावाला सध्या राजकीय उदासीनता आणि स्वार्थकारणाचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे.
भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अड्याळ ग्रामपंचायत ओळखली जाते. मात्र, येथील राजकीय खेचाखेची आणि भोंगळ कार्यप्रणालीची सध्या पंचक्रोशीत मोठी नाचक्की होत आहे. विकासकामांपेक्षा अंतर्गत वादालाच येथे जास्त महत्त्व दिले गेले. याचे जिवंत उदाहरण म्हणजे २००७ ते १२ च्या पंचवार्षिक कार्यकाळात चक्क पाच वर्षांत पाच सरपंच बदलले होते.या चालू पंचवार्षिक मध्येही राजकीय अस्थिरता पाहावयास मिळाली. ‘मी पुन्हा येईन’चे राजकारन करून पोटनिवडणूक पार पडली. असली तरी भोळ्या-भाबळ्या जनतेला विकासाच्या नावावर आणि जाहीरनाम्याद्वारे पोकळ आश्वासनाची पुंगी वाजवीनाऱ्या लोकप्रतिनिधींनी “एक ना धड भाराभर चिंध्या” या म्हणीप्रमाणे जनतेच्या मूलभूत समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असा आरोप केल्या जात आहे. येथे समाजकारणाऐवी केवळ “स्वार्थकारणाचे”राजकारण होत असल्याचा सूर सुजाण नागरिकांमधून उमटत आहे.
भंडारा-पवनी-चंद्रपूर महामार्गावर वसलेले अड्याळ हे भौगोलिक आणि व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे गाव आहे.माजी राज्यमंत्र्यांचे गाव म्हणून आणि संपूर्ण विदर्भाचे श्रद्धास्थान व जागृत देवस्थान असलेल्या हनुमंताच्या नावाने या तीर्थक्षेत्राची ओळख आहे. दरवर्षी आयोजित होणाऱ्या घोडायात्रेनिमित्त येथे लाखो भाविक येतात. मात्र, इतके ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असूनही, मुख्य रस्त्यावर साधे एक ‘प्रवेशद्वार’ (गेट) सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाला बांधता आलेले नाही, हीच या गावाची सर्वात मोठी शोकांतिका असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
राजकारनाचा बालेकिल्ला असलेल्या गावात समस्यांचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले असून सर्वसामान्य नागरिक पुरते नाकी नऊ आले आहेत. तसेच मुख्य रस्त्यावर पक्क्या घरांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याशिवाय मुख्य गुजरीचौक, धार्मिक स्थळे, बाजार परिसर आणि बसस्थानकावरील लहान-मोठ्या व्यावसायिकांनी रस्त्यांवरच आपली दुकानदारी थाटली आहे. वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे येथे दररोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. मुख्य आणि वर्दळीच्या
रस्त्यांवर मधोमध असलेले इलेक्ट्रिक आणि टेलिफोनचे खांब अपघाताला थेट आमंत्रण देत आहेत. त्यातच नळ पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांवरील लोखंडी सळ्या (सालाखी) बाहेर आल्या असून रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वयोवृद्ध, नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना या अपघात स्थळामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.गावात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांवर फरश्या बसवण्यात आलेल्या नाहीत. या उघड्या नाल्यांमुळे व चौका चौकात व मुख्य रस्त्यावरचे कचऱ्याचे ढिगारे यांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कमालीचा गंभीर बनला आहे.

समाजात वावरताना समाजकारणाचा बुरखा पांघरल्याचा आव आणून काही स्वयंघोषित सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते माहितीच्या अधिकाराचा (RTI) गैरवापर करत असल्याची जोरदार चर्चा गावात रंगली आहे. शासकीय कामाची ठेकेदारी मिळवणे, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून कमिशन लाटणे आणि स्वतःची उपजीविका चालवण्यासाठीच ही ‘दुकानदारी’ थाटली असल्याचा थेट आणि उघड आरोप आता त्रस्त ग्रामस्थांकडून केला जात आहे.
वैयक्तिक स्वार्थ आणि राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून, गावच्या विकासासाठी आणि या गंभीर समस्यांचा निपटारा करण्यासाठी आता कोणते सत्यवादी आणि निष्ठावंत सामाजिक व राजकीय कार्यकर्ते ‘गब्बर’ बनून कंबर कसणार, याकडे संपूर्ण गावाच्या नजरा लागल्या आहेत.
