बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश..!

 

गोंदिया – ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत पुरगाव या गावात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती(दि. 25 डिसें.) रोजी सकाळी 11.30 वाजता प्राप्त झाली. या माहितीची तात्काळ दखल घेत मा. जिल्हाधिकारी प्रजित नायर, मा.पोलिस अधीक्षक गोरख भामरे आणि मा.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती रेश्मा आर. मोरे यांचे आदेशान्वये आणि मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्ष , इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया, दामिनी पथक, चाइल्ड हेल्पलाइन आणि गोंदिया पोलीस स्टेशन यांची टीम तयार करून प्राप्त माहितीनुसार होऊ घातलेल्या विवाहातील बालक आणि बालिकेचे जन्म प्रमाणपत्र ग्रामसेवक यांचेकडून प्राप्त करून घेण्यात आले. सदर प्रमाणपत्रा नुसार बालकाचे वय (१८ वर्ष २ महिने १५ दिवस) बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार पूर्ण नसल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने संपूर्ण टीम पुरगाव या गावात 12.30 वाजता पोहोचली.

दुपारी 2.00 वाजता होणाऱ्या विवाहाची संपूर्ण तयारी झालेली होती. काही वेळात लग्न लागणार त्यावेळी पोलिसांसह महिला बाल विकास विभागाच्या टीमने व इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी टीमने नवरदेव, नवरी त्यांच्या आई वडील आणि नातेवाईक यांना ताब्यात घेऊन सदर होऊ घातलेल्या विवाहातील बालकांचे वय कमी असून बालविवाह प्रतिबंधक 2006 च्या कायद्यानुसार वय पूर्ण नसल्याने गुन्ह्यास पात्र आहे. बालविवाह मुळे होणारे दुष्परिणाम बालकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय 18 आणि मुलाचे वय 21पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे हमीपत्र आणि संमती पत्र बालकांच्या आई-वडिलांकडून आणि नातेवाईकांकडून लिहून घेण्यात आले.

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांचे नेतृत्वात संपूर्ण कार्यवाही करण्यात आली. यामध्ये इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे जिल्हा समन्वयक (असेस टू जस्टीस ) ज्ञानेश्वर पटले, धर्मेंद्र भेलावे, अजय खोब्रागडे, अमित बेलेकर, पुजा अनकर, दामिनी पथक गोंदिया चे प्रशांत बन्सोड, वैशाली भांडारकर, सुवर्णा मडावी , सोनाली टिके व गोंदिया पोलीस स्टेशन चे भागवत दसरिया व राजू नागदेवे हे बालविवाह थांबविण्याच्या कार्यवाहीमध्ये सहभागी होते

Leave a Comment