लाच प्रकरणातून ब्राह्मणकर यांची निर्दोष सुटका..!

गोंदिया :- जिल्ह्यातील केटीएस सामान्य रुग्णालयातील मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता (आरोग्य विभाग) दिलीप ब्राह्मणकर यांची लाच लुचपत प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. हा निर्वाडा दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. टी. असीम यांनी 23 डिसेंबर 2025 रोजी दिला.

यातील तक्रारदाराने तांत्रिकी अभ्यासक्रम 2011 मध्ये पूर्ण केला. ऑक्टोबर 2012 मध्ये ते भूमी अभिलेख कार्यालय नागपूर येथे सर्वेयरची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. दरम्यान, त्यांना जिल्हा शल्यचिकित्सका कडून फिटनेस प्रमाणपत्र हवे होते त्यामुळे 31 ऑक्टोबर 2012 रोजी ते केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आले. ओपीडीची चिट्ठी काढली व डॉक्टरानी आदेशित केलेल्या संपूर्ण तपासण्या केल्या. पुढे प्रमाणपत्र देतेवेळी त्याच दिवशी दिलीप ब्राह्मणकर यांनी 600 रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने करीत तशी तक्रार एक नोव्हेंबर 2012 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीवरून लाच लुचपत विभागाने त्याच दिवशी अर्थात एक नोव्हेंबर 2012 रोजी बारा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात सापडा रचला. यावेळी दिलीप ब्राह्मणकर यांना 600 रुपयाची लाज घेताना अटक केली. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्कालीन तपासणी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी तपासांती दिलीप ब्राह्मणकर यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. पुढे खटला चालविण्यात आला.

दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.टी. असीम यांनी सदर खटल्यामध्ये उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकला दरम्यान अभिलेखा वरील सर्व कागदोपत्री व तोंडी पुराव्याचे अवलोकन करून दिलीप ब्राह्मणकर यांची लाच प्रकरणातून 23 डिसेंबर रोजी निर्दोष सुटका केली. सदर खटल्यामध्ये दिलीप ब्राह्मणकर यांची बाजू एडवोकेट प्रवीणकुमार श्रावण श्यामकुवर यांनी मांडली.

Leave a Comment