सावरटोला येथे बिबट्याने पाडला दोन बकरे व एका शेळीचा फडश्या

 

 

पशुपालक महिलेचे २५ हजार रुपयाचे नुकसान. बोरटोला येथेही एका शेळीचा घेतला बळी.

 

नवेगावबांध/गोंदिया :-नजीकच्या सुरगाव,चापटी,सावरटोला,बोरटोला बीडटोला,भुरसीटोला परिसरात सध्या बिबट्या धुमाकूळ घालत असून या परिसरातील शेकडो कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या, तर अनेक शेळ्यांचे बळी बिबट्याने घेतले आहे.

याच घटनाक्रमात काल दि.१२ ऑक्टोंबर रविवारच्या मध्यरात्री सावरटोला येथील यशोदा नारायण डोये यांच्या घरच्या गोठ्यात प्रवेश करून पहाटेच्या सुमारास दोन बकरे व एका शेळीचा फडश्या बिबट्याने पाडला आहे.जवळपास त्यांचे २५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

एकीकडे परतीच्या पावसाने शेतातील धान पिकाचे नुकसान केले.उरलेले धान पिकांचे नुकसान, मावा-तुडतुडा रोग करित आहे.तर दुसरीकडे बिबट्या रोज कुठे ना कुठे शेळ्या,बकरे,कोंबड्या यांच्यावर ताव मारून गोपालक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करत आहे.असे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, पाळीव पशु पालकांचे आर्थिक नुकसान होत असताना,हा बिबट्याचा नुकसानीचा सर्व घटनाक्रम होत असताना वन विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.या सभोवतीच्या परिसरातील जनतेत विशेषत: शेळ्या,बकरे,कोंबड्या व पाळीव प्राणी पालकांच्या मनात याबाबत असंतोष खदखदत आहे.

तर दि.८ ऑक्टोंबर गुरुवारच्या मध्यरात्री बोरटोला येथील चिंतामण येरणे यांच्या गोठ्यात प्रवेश करून बिबट्याने एका गर्भवती शेळीचा बळी घेतला.त्यांचे १० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

नुकसानीच्या मानाने फारच अल्प असे आर्थिक सहाय्य वनविभागामार्फत दिल्या जाते.तेही ताबडतोब न देता वर्षांनू वर्षांनी आर्थिक सहाय्य द्यायलाही वन विभागाकडून विलंब लागतो.त्यामुळे नागरिकांच्या मनात आणखीनच संतापाची भावना पसरली आहे.

सावरटोला प्रकरणी बाराभाटी सहवन क्षेत्राच्या बीट वनरक्षक मंगला खोब्रागडे यांनी वन विभागाच्या वतीने सीसीटीव्ही लावण्यात येईल असे सांगितले आहे.

तर सावरटोला,बोरटोला येथील संतप्त ग्रामवाशियांनी सापळा लावून गेल्या काही महिन्यापासून त्रास देणाऱ्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांचे,पशुपालकांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा.अशी मागणी वन विभागाकडे केली आहे.

संजयनगर,धमदीटोला मानव वन्यजीव संघर्षाची वाट तर वन विभाग पहात नाही ना? असा प्रश्नही संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

मौजा मुंगली,सावरटोला मार्गावरील आदर्शनगर येथेही सायंकाळी बिबट्या भटकत असल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे.संध्याकाळ झाली की येथेही संचारबंदी लागल्यागत ग्रामस्थ स्वतःला जीवाच्या आकांताने घरात कोंडून घेतात, एवढी दहशत या परिसरात आहे.

याबाबत आपण वन विभागाकडे बिबट्या या परिसरात नियमित येतो.अशी तक्रार केली असता,तो सहज फिरायला येतो असे वनविभागाचे कर्मचारी उत्तर देतात अशी.माहिती मुंगली येथील राईस मिलचे मालक बबलू येरणे यांनी दिली आहे.

एकूणच वन विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण झाला असून,जीवाच्या आकांताने स्वतःच्या जीवाची स्वतः सुरक्षितता करायची याशिवाय दुसरा पर्याय‌ आमच्यासमोर नाही असे या परिसरातील गावकरी म्हणत आहेत.

वन विभागाने कुठल्याही अप्रिय घटनांची वाट न पाहता सापळी लावून,या बिबट्यांचा बंदोबस्त करावा.अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे.वन विभाग याबाबत काय पावले उचलतो? याकडे या परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment