ट्रेंडिंग स्टोरी
विज्ञापन

शहरातील दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त; प्रशासकीय यंत्रणेकडे नागरिकांचे लक्ष..!

 

सालेकसा, प्रतिनिधी – राजू फुंडे :- सालेकसा नगर पंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 8 व 11 मध्ये अनेक वर्षांपासून नळ पाणीपुरवठा योजना सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना नळाद्वारे दूषित व गढूळ पाणी मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांमध्ये आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नळातून येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असून त्यामध्ये गाळ व अशुद्ध घटक आढळून येत आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे.

दरम्यान, पावसाळा तोंडावर आला असून शहरातील अनेक नाल्यांची नियमित साफसफाई झालेली नसल्याचे दिसून येते. नाल्यांमधील साचलेला कचरा व घाण यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे दूषित पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाकडे तातडीने पाणीपुरवठा योजनेची तपासणी करून स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच शहरातील सर्व नाल्यांची युद्धपातळीवर साफसफाई करून संभाव्य साथीच्या रोगांचा धोका टाळावा, अशीही मागणी होत आहे.

सालेकसा नगरातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन नगर पंचायत प्रशासनाने त्वरित दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त हो आत आहे.

Leave a Comment