विकास परसराम मेश्राम यांना ‘अटल बिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मान’ प्रदान

 

– पत्रकारिता, समाजसेवा व वंचित घटकांच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण लेखनाची राष्ट्रीय पातळीवर दखल

 

गोंदिया प्रतिनिधी (दि. २६ डिसें.)— समाजसेवा, ग्रामीण विकास आणि पत्रकारिता क्षेत्रात गेली अनेक वर्षे सातत्याने कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विकास परसराम मेश्राम यांना प्रतिष्ठेचा ‘अटल बिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मान’ प्रदान करण्यात आला. जीवन जागृती सेवा संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

 

विकास मेश्राम हे पत्रकारिता क्षेत्रातही सक्रिय असून त्यांनी दैनिक देशोन्नती, तरुण भारत यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसह Max Maharashtra, जागल्या भारत, करंट काऊंटर, CSR, काऊंटर व्ह्यू या ऑनलाईन माध्यमांमध्ये शेकडो लेख सातत्याने प्रकाशित केले आहेत. त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू हा नेहमीच दलित, आदिवासी, शेतकरी, महिला, पर्यावरण, हवामान बदल व सामाजिक विषमता या ज्वलंत विषयांभोवती राहिला आहे.

 

गेल्या १४ वर्षांहून अधिक काळ त्यांनी ग्रामीण व आदिवासी भागात प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर काम करत समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न केवळ लेखनापुरते न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून मांडले आहेत. विविध स्वयंसेवी संस्था, संशोधन संस्था व विकास क्षेत्रातील संघटनांसोबत कार्य करत त्यांनी शाश्वत विकासासाठी योगदान दिले आहे.

 

त्यांच्या लेखनातून वास्तववादी मांडणी, समाजाभिमुख दृष्टिकोन आणि संवेदनशील पत्रकारिता दिसून येते. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी हा सन्मान वैयक्तिक नसून समाजासाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रयत्नांची पावती असल्याची भावना व्यक्त केली. “पुरस्कार तात्पुरते असतात, मात्र कामाची दखल घेतली जाणे हीच खरी प्रेरणा आहे,” असे त्यांनी सांगितले.

 

या सन्मानामुळे विकास मेश्राम यांच्या पत्रकारिता व समाजसेवेच्या कार्याला नवी दिशा आणि ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment