केटीएस रुग्णालयातील बेडअभावी दुर्दैवी मातामृत्यू; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह..!

 

गोंदिया, दि. 28 मार्च — शहरातील केटीएस सामान्य रुग्णालयात (KTS General Hospital) बेडअभावी उपचारात झालेल्या विलंबामुळे एका मातेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 मार्च रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास मृतक पूर्णिमा सुरेश मस्के वय बावीस वर्षे राहणार राजगुडा तालुका सडक अर्जुनी, हिला बाळासह रुग्णालयात दाखल केले. दरम्यान तिची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने तातडीने आयसीयू (ICU) मध्ये उपचाराची गरज होती. मात्र, रुग्णालयात आयसीयू बेड उपलब्ध नसल्यामुळे तब्बल दोन तास मृत्कास आवश्यक उपचार मिळू शकले नाहीत.

दरम्यान, परिस्थिती गंभीर होत असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथे रुग्णालयात रेफर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, काही वेळातच केटीएस रुग्णालयात आयसीयू बेड उपलब्ध झाल्याने मातेला तेथेच दाखल करण्यात आले.

सलग 22 तास रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. तरीही प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर उपचारादरम्यान मातेचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर आरोप करण्यात येत आहेत. वेळेवर आयसीयू बेड उपलब्ध झाला असता तर मातेचा जीव वाचू शकला असता, असा दावा नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान, या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा आणि बेडची संख्या वाढवण्याची गरजही यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

मृत महिलेचा बीपी स्थिर होत नसल्यामुळे मल्टीफेल्युअर ऑर्गन च्या शक्यतेने मृत्यू झाल्याची घटना घडली. – डॉक्टर मरसकोल्हे, प्रभारी अधिष्ठाता केएटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया.

Leave a Comment