गोंदिया ग्रंथोत्सव-2025 ग्रंथ दिंडीचे थाटात उद्घाटन..!

 

गोंदिया, दि.4 : ग्रंथपूजन करुन ग्रंथदिंडीचे विधीवत उद्घाटनाने ग्रंथ महोत्सवाला सुरुवात. सहायक धर्मदाय आयुक्त डॉ.दिशा पजई यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने गोंदिया ग्रंथोत्सव-2025 चे आयोजन  आयोजित करण्यात आले असून त्यानिमित्ताने आज नविन प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे सकाळी 9.30 वाजता उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सहायक ग्रंथालय संचालक नागपूर रामदास साठे, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा, सचिव डी. डी. रहांगडाले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे, ग्रंथालय निरीक्षक अस्मिता मनपे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे, आरोग्य विभागाचे आय.ई.सी. प्रमुख प्रशांत खरात यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रारंभी आंबेडकर चौक, गोंदिया येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तद्नंतर शालेय विद्यार्थ्यांच्या लेझिमच्या तालात ग्रंथदिंडी ही आंबेडकर चौक येथून निघून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा-नेहरु चौक-गोरेलाल चौक-गांधी प्रतिमा अशी मार्गक्रमण करुन श्री गुरुनानक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोंदिया येथे ग्रंथदिंडीचे समापन करण्यात आले. या ग्रंथदिंडीस गोंदिया शहरातील नागरिकांचा तसेच शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग होता. यावेळी सिकलसेल अभियानाची सुध्दा जनजागृती करण्यात आली.

0000000

Leave a Comment