गोंदिया :- संघर्ष समता सामाजिक बहुउद्देशीय संस्था द्वारे संचालित लिटल किड्स कॉन्व्हेंट चारगाव तथा गात्रा येथे (दि. 4 जाने.) रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक कुलदीप पटले सरपंच ग्रामपंचायत गात्रा, मुख्य अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य सुनिता ताई दिहारी, शीलाताई वासनिक सरपंच ग्रामपंचायत रावनवाडी, तर अध्यक्षस्थानी गणेश बर्डे अध्यक्ष विविध सेवा सहकारी संस्था गात्रा, हे होते. या प्रसंगी ज्योतीताई नागपुरे सरपंच ग्रामपंचायत चारगाव, बालूताई लिल्लारे सरपंच ग्रामपंचायत मुरपार, आशिष मिश्रा उपसरपंच ग्रामपंचायत गात्रा व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमात छोट्या छकुल्यांनी विविध नाटक, नृत्य आदींच्या द्वारे आपले कला कौशल्य दाखवताना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी त्यांनी सादर केलेले किलबिल नृत्य विविध सामाजिक विषयावरील संदेश देणारे नाटक आदी उपक्रमांद्वारे उपस्थित प्रेक्षकांचे मन जिंकले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरातील पालक तथा पदाधिकाऱ्यांनी संस्थेद्वारे होणाऱ्या विविध उपक्रमांना मोलाची साथ देऊन यापुढेही लिटिल किड्स कॉन्व्हेंट चे प्रदर्शन उत्तम होईल अशी आशा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे अध्यक्ष संतोष कुमार शेंडे यांनी केले तर आभार कॉन्व्हेंटच्या संचालिका पल्लवी लांजेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता संचालिका प्रीती संतोषकुमार शेंडे, शिक्षिका अंकिता ठाकूर, गीता सोनवणे, सुनीता पारधी आदींनी अथक परिश्रम घेतले.
