ट्युशनला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू..!

 

सालेकसा:-  तालुक्यातील गांधी टोला ते साखरीटोला मार्गावर ट्युशनला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी 18 मे रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून गावावर शोककळा पसरली आहे.

मोहिनी संतोष मेंढे (वय 15 वर्षे, रा. गांधी टोला, सालेकसा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मोहिनी ही नववी उत्तीर्ण होऊन दहावीत प्रवेश घेणार होती. ती अभ्यासू व प्रेमळ स्वभावाची असल्याने गावात सर्वांची लाडकी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहिनी ही रविवारी सकाळी सायकलने साखरीटोला येथे ट्युशनसाठी जात होती. दरम्यान गांधी टोला ते साखरीटोला मार्गावर भरधाव टँकरने तिला धडक दिली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व ती घटनास्थळी बेशुद्ध पडली.

घटनेची माहिती मिळताच तिच्या वडिलांनी तिला तत्काळ सागरटोला येथील एका खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी आमगाव येथे हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मोहिनीच्या अकाली निधनाची बातमी परिसरात पसरताच नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. गावात शोकमय वातावरण निर्माण झाले असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रस्ता रुंदीकरणाची मागणी

साखरीटोला–तीरखेडी–सालेकसा मार्ग अरुंद असल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याची बाब पुन्हा समोर आली आहे. मोठी वाहने समोरून आल्यास सायकलस्वार व दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. वाहतुकीची वाढती वर्दळ लक्षात घेता या मार्गाचे तातडीने रुंदीकरण करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.यासंदर्भात पंचायत समिती सदस्य रेखा फुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी केली आहे.

Leave a Comment