गोंदिया, दि.26 : प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्याकरीता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरीता राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेत सर्व विभागाने सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2025-26 बाबत सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी श्री. बेहेरे बोलत होते. सभेला उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मधुकर वासनिक, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, जिल्हा प्रकल्प अधिकारी हरिचंद्र पौनिकर यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
श्री. बेहेरे म्हणाले, या अभियानांतर्गत सन 2025-26 साठी कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब, सेवांची गुणवत्ता/दर्जा यामधील वाढ व उपक्रमांची परिणामकारकता, लोकाभिमुखता, ई-गव्हर्नस, संसाधनांचा पर्याप्त व प्रभावी वापर, तंटा/तक्रार मुक्त कार्यालय, नाविन्यपूर्ण व पथदर्शी स्वरुपाच्या संकल्पना/प्रयोग/उपक्रम, असे सात कार्यक्षेत्रे आहेत.
या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व यंत्रणेच्या कारभारात अधिक गतिमानता आणण्याच्या दृष्टीने चालना मिळणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या खात्याचा कारभार जास्तीत जास्त लोकाभिमुख तसेच तत्पर व कार्यक्षम होण्याच्या दृष्टीने स्पर्धेच्या कालावधीत व त्यानंतरच्या कालावधीत प्रयत्न करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व खात्यातील सर्व अधिकारी व सेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. या स्पर्धेसाठी वेबपोर्टल https://pragatiabhiyan.maharashtra.gov.in/ यावर जावून आपली नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे श्री. बेहरे यांनी नमूद केले.
सर्वांनी आपले युजर नेम व पासवर्ड जतन करुन ठेवण्यात यावे. या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्या खात्यामध्ये कोणत्या प्रकारे कार्यवाही करणार आहात याचा तपशिलवार आराखडा सादर करणे अपेक्षित आहे. त्यानुसार आपल्या विभागाकडील तयार केलेल्या आराखड्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सादर करणे अनिवार्य राहील. या स्पर्धेचा कालावधी मागील 20 ऑगस्ट 2024 ते 19 ऑगस्ट 2025 पर्यंत राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रशासकीय कार्यालयांना उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी पुरस्कार दिले जातील असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
राजीव गांधी प्रशसकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा सन 2025-26 चे सादरीकरण जिल्हा प्रकल्प अधिकारी हरिचंद्र पौनिकर यांनी विस्तृतपणे केले.यावेळी आपले सरकार पोर्टलवरील तक्रारी निकाली काढण्यात यावे, जी.पी. पोर्टलला तक्रारी शुन्य असल्या पाहिजेत, 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांचे आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. 26 जानेवारी 2026 पर्यंत पोर्टलवरुन आधारकार्ड अपडेट नि:शुल्क करण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली.
