जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात 

 

गोंदिया ता.14 :-  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे पुरस्कार अभियान राबविण्याचा संकल्प घेण्यासाठी जिल्ह्यात बुधवारी 17 सप्टेंबर रोजी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील सुमारे 548 ग्रामपंचायतींमध्य या विशेष ग्रामसभांचे आयोजन होणार असून आपल्याच ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळायला पाहिजे यासाठी ग्रामपंचायतिही सज्ज झाल्या आहेत. परिणामी लोकसहभागातून हे पुरस्कार मिळवण्यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी कंबर कसली आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम.यानी दिलेल्या माहितीनुसार या अभियानाची प्रभावी अमलबजावणी करण्याची ग्रामपंचायतींची महत्वाची भूमिका असून 17 सप्टेंबर पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला प्रारंभ होणार आहे.ते 31 डिसेंबर पर्यंत राबविण्यात येईल.

याबरोबरचं पुढील ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यावेळी मुरुगानंथम यांनी सांगितलं की सण 2025-26 या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य या चार स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार अभियान राबविण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. राज्य स्तरावर येणाऱ्या ग्रामपंचायतीना सुमारे पाच कोटी रुपयाचा पुरस्कार मिळणार आहे.

या अभियानाचे आठ मुख्य घटक आहेत. या अभियान कालावधीत संपूर्ण आठ घटकांवर झालेल्या कामगिरीच्या आधारे गुणांकन करून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेची पुरस्कारासाठी निवड केली जाईल.सर्वांना सोबत घेऊन चला या विकासाच्या संकल्पनेत एकही व्यक्ती मागे राहता कामा नये, प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासनाच्या सर्व योजना,

कार्यक्रम,पोहोचले पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे. ग्रामीण भागात विकास होण्यासाठी शासकीय विविध विभागांचा सहभाग मिळणार आहे. ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना कामगिरी नुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावी व जलद गतीने अमलबजावणी करून त्यांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावून ग्रामपंचायतमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण भागातील लोकांना सुलभ रीतीने सेवा देणे, महाराष्ट्रातील थोर संत परंपरेचा सहभाग घेणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या मुख्य क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढवून पंचायतराज संस्था गतिमान करणे या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येणार आहे.

हे अभियान एक लोकचळवळ व्हावं यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेचा आमचा प्रयत्न आहे. असे मुरुगानंथम म्हणाले.

Leave a Comment