ट्रेंडिंग स्टोरी
विज्ञापन

लाखांदूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ग्रामपंचायतीच्या शेडमधील चोरीचा ४ दिवसांत उलगडा, पाच आरोपी गजाआड

५.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त; ट्रॅक्टर, ट्रॉली आणि दुचाकीसह चोरीचे टिन पत्रे हस्तगत

मुरमाडी :- लाखांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव/कोहळी येथील ग्रामपंचायतीच्या कचरा संकलन व वर्गीकरण शेडमधून टिनाची पत्रे चोरी झाल्याच्या गुन्ह्याचा लाखांदूर पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत उलगडा करत पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने जप्त करून एकूण ५.४२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कार्तीक जयदेव जनबंधु (वय ३०, रा. पिंपळगाव/कोहळी, ता. लाखांदूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत उभारण्यात आलेल्या कचरा संकलन व वर्गीकरण शेडवरील १८ टिनांपैकी १२ निळ्या रंगाची टिनाची पत्रे अज्ञात चोरट्यांनी नट-बोल्ट काढून चोरी केली होती. चोरीस गेलेल्या टिनांची किंमत सुमारे १२ हजार होती. याप्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०३(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी घनश्याम मनरंजन गेडाम (३०), उज्वल राजेश नाकाडे (२७), हितेश पुंडलिक बेदरे (२६), अनिकेत शिवराम ठाकरे (२३) आणि राकेश माणिक नाकाडे (२७), सर्व रा. पिंपळगाव/कोहळी, ता. लाखांदूर यांना ३० जून रोजी अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेली १२ निळ्या रंगाची टिनाची पत्रे, गुन्ह्यात वापरण्यात आलेला स्वराज ८४३ एक्सएम ट्रॅक्टर, एमएच-३६/८५८० क्रमांकाची ट्रॉली तसेच एमएच-३६ AQ-२४२३ क्रमांकाची बजाज चेतक दुचाकी असा एकूण ५.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जयेश जौंजारकर, संतोष चव्हाण तसेच पोलीस अंमलदार निलेश चव्हाण आणि ओंकार सपाटे यांनी केली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना प्रथम श्रेणी न्यायालय, लाखांदूर येथे हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ जुलै २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.

Leave a Comment