नागपुर प्रतिनिधी :- शास्रीय संगीत क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणा-या संगीताचार्य कै पं.अमृतराव निस्ताने यांचे संस्मरण तसेच नववर्ष स्नेहमिलन संगीत समारोह अमृत प्रतिष्ठान, नागपूर तर्फे शनिवार (दि. 10 जाने.) रोजी संपन्न झाला. अमृत प्रतिष्ठान गेली 26 वर्षापासून संगीत क्षेत्रात निस्वार्थ पणे कार्यरत असून सामाजिक बांधिलकी सोबत सांस्कृतिक धरोहर जोपासत आहे.
सुप्रसिद्ध संतूर वादक पं.वाल्मीकजी धांडे, सरोद वादक पं.शकर भट्टाचार्य आणि अमृत प्रतिष्ठान चे अध्यक्ष दिवाकर निस्ताने, सचीव मोरेश्वर निस्ताने यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सरस्वती वंदना आणि गुरुवंदना ने संगीत समारोहचा शुभारंभ झाला. अतिशय समर्पक असे कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सोनाली अडावदकर यांनी केले.
प्रथम सत्रात प्रतिभावान युवा तबलावादक आकाश जवादे याच्या एकल तबला वादनाने झाले. त्यांनी तीनतालातील लयकारी युक्त बाज विवीध कायदे,परन,रेला अतिशय उत्तम आणि प्रभावीपणे सादर केलेली प्रस्तुती रसिकांची भरभरुन दाद मिळवुन गेली.
संगीत समारोहातील द्वितीय सत्रात प्रतिभावान शास्त्रीय गायिका खुशबू कठाणे यांनी आपल्या गायनाची सुरुवात गोरख कल्याण रागाने बिलंबीत तीनतालातील स्वरचित बंदिशीने केली मध्यलयीतील “सांज की बेला शुभ दिनी आज ” या बंदिशीनंतर त्यांनी ” चैत मांस बोले रे कोयलीया ही चैती प्रभावीपणे सादर केली. त्यांनी आपल्या गायनाचे समापन “अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन” या भजनाने केले. जयपूर घराण्याच्या अतिशय सुरेल,स्पष्ट स्वर- आलापी आणि तानां नी नटलेल्या रंजक आणि प्रभावी गायकीने वातावरण भारून गेले होते. रसिक श्रोते ही मंत्रमुग्ध झाले. त्यांना संवादिनीवर पं.अजय हेडाऊ आणि तबल्यावर आकाश जवादे यांनी साजेशी दमदार दमदार साथ करुन मैफिलीचा आनंद द्विगुणित केला व श्रोत्यांकडूनही त्यांना भरभरुन दाद मिळाली.
या प्रसंगी कलावंतांचा यथोचित सत्कार पुष्प गुच्छ, गौरव पत्र स्मृतिचिन्ह देवून करण्यात आला
संगीत कलेतील प्रतिभावान विद्यार्थिनी राधा ठेंगडी (खडसे)यांनी नागपूर विद्यापीठाच्या 113 व्या दीक्षांत समारंभात कंठ संगीतात पदव्युत्तर पदवी संपादन करून संगीताचार्य कै.पं.अमृतराव निस्ताने सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल त्यांना अमृत प्रतिष्ठान तर्फे यथोचित सत्कार करून गौरविण्यात आले. तसेच प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री.दिवाकर ( मोहन) निस्ताने ह्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त निस्ताने कुटुंबीय आणि मित्र परिवारातर्फे त्यांच्या कार्याचा उल्लेख करुन मानपत्राने गौरविण्यात आले.
या संगीत समारोहाला संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवर सुप्रसिध्द संतुर वादक पं.वाल्मिकजी धांदे, सरोद वादक पं. शंकर भट्टाचार्य, आकाशवाणी नागपूर चे भूतपूर्व निदेशक दिगंबर पिंपळघरे, अशोक डोके, प्रभु साठे, माधव पालमवार, गायिका, सीमा दामले ,डॉ . राजेंद्र डोळके, मधुरिका गडकरी, सुरेश खर्डेनविस,वसंत पत्थे, यशोधन कानडे, श्रीराम शास्त्रकार, राम पवनारकर,ओम प्रकाश मुंधडा, संजय देशमुख, मोहन निस्ताने,मोरेश्वर निस्ताने सह रसिक श्रोत्ये आणि युवावर्गाची उपस्थिती होती. सांस्कृतिक परंपरा जोपासणारा असा हा मनमोहक संगीत समारोह चिरकाल स्मरणात राहील.
