ट्रेंडिंग स्टोरी
विज्ञापन

गोंदियातील सांस्कृतिक नाट्य भवनाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करा

▪️कलावंतांच्या प्रतिनिधी संस्थेकडे व्यवस्थापनाची जबाबदारी देण्याचीही मागणी

गोंदिया : – गोंदिया शहरातील रेलटोली परिसरात नगर परिषदेमार्फत अनेक वर्षांपासून निर्माणाधीन असलेल्या सांस्कृतिक नाट्य भवनाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून ते गोंदिया जिल्ह्यातील कलावंतांसाठी उपलब्ध करून द्यावे, तसेच भविष्यात या भवनाच्या व्यवस्थापनात कलावंतांच्या प्रतिनिधी संस्थेला सहभागी करून व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी गंधार संगीत कलाकार बहु संस्था (रजि.), गोंदिया, संविधान मैत्री संघ गोंदिया आणि विदर्भ राज्य आंदोलन समिती गोंदिया यांच्या वतीने करण्यात आली.

यासंदर्भात जिल्हाधिकारी मा. मंदार पत्की यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रती राज्यसभा खासदार राजेंद्र जैन, गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष सचिन शेंडे, नगर परिषद गोंदियाचे मुख्याधिकारी, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे सभापती अनुज जायसवाल तसेच बांधकाम विभागाचे सभापती पिंटू माने यांना देण्यात आल्या.

निवेदनात म्हटले आहे की, गोंदिया शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गायक, वादक, नाट्यकलावंत, नृत्यकलावंत, लोककलावंत, साहित्यिक तसेच विविध कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलावंतांची मोठी संख्या आहे. मात्र, या कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी सुसज्ज नाट्यगृह किंवा सांस्कृतिक भवन उपलब्ध नसल्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रेलटोली परिसरात नगर परिषद गोंदियामार्फत सांस्कृतिक नाट्य भवनाची निर्मिती अनेक वर्षांपासून सुरू असून, सदर काम अद्याप पूर्ण झालेले नाही. शासनाचा निधी खर्च होऊनही या वास्तूचा अपेक्षित उपयोग नागरिक व कलावंतांना मिळू शकलेला नाही. त्यामुळे उर्वरित बांधकाम व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करून हे भवन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

भवनामध्ये सुसज्ज रंगमंच, ध्वनी व प्रकाश व्यवस्था, बैठक व्यवस्था, पडदे, कलाकारांसाठी मेकअप रूम/ग्रीन रूम, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, पार्किंग आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

तसेच सदर सांस्कृतिक नाट्य भवन गोंदिया जिल्ह्यातील गायक, वादक, नाट्यकलावंत, नृत्यकलावंत, लोककलावंत व इतर सर्व कलावंतांसाठी उपलब्ध करून द्यावे. कलावंतांच्या प्रतिनिधित्वासाठी कार्यरत असलेल्या नोंदणीकृत संस्थेला भवनामध्ये स्वतंत्र कार्यालयीन जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून कलावंतांच्या विविध उपक्रमांचे नियोजन व समन्वय प्रभावीपणे करता येईल, अशी मागणी करण्यात आली आहे.

भवनाचे दैनंदिन व्यवस्थापन, कार्यक्रमांचे नियोजन, बुकिंग, कलावंतांना उपलब्धता व देखभाल यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील कलावंतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नोंदणीकृत संस्थेला योग्य सहभाग व व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात यावी. नगर परिषद आणि कलावंत प्रतिनिधी संस्था यांच्या समन्वयातून पारदर्शक व्यवस्थापन व्यवस्था निर्माण करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

स्थानिक कलावंतांना परवडणाऱ्या दरात भवन उपलब्ध करून देऊन त्यांना प्राधान्य द्यावे. तसेच वर्षभर नाट्यप्रयोग, संगीत मैफिली, कला प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा व विविध सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

गोंदिया जिल्ह्यातील कलावंतांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सांस्कृतिक नाट्य भवन लवकरात लवकर पूर्ण होऊन गोंदियाच्या सांस्कृतिक क्षेत्राचे केंद्र म्हणून विकसित व्हावे, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली.

यावेळी गंधार संगीत कलाकार बहु संस्था तर्फे सुनील जायसवाल (सोनी साउंड), आशीष रा. देशभ्रतार, अतुल सतदेवे, दिलीप कोसरे, गुड्डू राउत, पिंटू बिसेन, बंटी संगोडे, अनूप बोरकर , परेश लोखंडे, सोहन पटले, श्याम बघेले, शुभम तुरकर , राहुल उके, जय परमार ; संविधान मैत्री संघ तर्फे अतुल सतदेवे; तसेच विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे छैलबिहारी अग्रवाल, जया कुमार व माया जांभुळकर उपस्थित होते.

Leave a Comment